सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
देवीचे प्रकटीकरण व स्थापना:
मागील प्रकरणात आपण वाचलेच असेल की, कशा प्रकारे देवीने आपल्या अस्तित्वाची कल्पना क्षीरसागर मूळ पुरूषांस दिली. 2 / 3 वेळेस सतत स्वप्न दृष्टांत झाल्यावर व जागाही दिसल्यावर क्षीरसागरांनी त्याठिकाणी जाउन जागा खणण्यांस सुरूवात केली आणि आश्चर्य म्ह‍णजे तिथे पाषाणाची तांदळाकृती प्रतिमा व सभोवती हळदी कुंकवाच्या पेटया भरलेल्या, अशा स्वरूपातील निर्गुण जगदंबा तांदुळाकार मूर्ती सापडली. त्या दिवशीचा योग अत्यंत उज्वल असल्याचे जाणून, तिथल्यातिथेचे वेदिका रचून ती मुर्ती समंत्रक स्थापन केली. तो पर्वकाळ होता. तिथे आजुबाजुला पाणी लागेल कां असा प्रश्‍न पडल्याने, देवीचे नांव घेउन खणून बघितले. सभोवतालच्या परिसरात 40 फुटांवर खणले तर जिवंत पाण्याचे झरे लागले व तिथे सर्वांनी हा देवीचाच प्रसाद म्हणून तिथे खणून बारव बांधली. आजपर्यंत त्या बारवेचे पाणी सारा गाव वापरतो.
पाणी अत्यंत गोड व पाचक असुन त्याच्या सेवनाने समाधान व आनंद प्राप्त होतो. तीर्थाप्रमाणे पाणी आहे. ही जगदंबेची कृपा म्हणून त्या बारवेची ज्ञानवापी म्ह‍णतात. नवरात्रात देवीच्या आरतीनंतर प्रथम बारवेची आरती होते. तिथे ज्ञानेश्वपराची आरती म्हंणतात. काशी क्षेत्रातील ज्ञानवापीप्रमाणेच इथे ही बारवेचे महत्व‍ मानतात. देवळाच्या उत्‍तर दरवाज्यातला पाणीदरवाजा म्हणतात.
जगदंबेच्‍या उजव्या बाजूला कालिका देवी व डाव्या बाजूला महालक्ष्मी‍चे निर्गुण स्वरूप पाषाणमूर्ती आ‍हेत. देवीचे स्थापनेपूर्वीच सर्व जणांनी म्ह‍णजे आमचे पूर्वज व त्यांच्या मित्रमंडळींनी चोंभूत सोडून इथेच देवीपाशी रहाण्या‍चा निश्चय करून सर्वजण तिथेच राहू लागले. भूविवरात देवी प्रकटली म्हणून त्याला देवीभूविवर म्हणु लागले व त्याचे आज देवीभोयरे म्हणून नांव पडले. देवीच्या बारवेमध्येसुध्दा दुसरी निर्गुण मूर्ती तांदळा मिळाली. तिची तिथेचे स्थापना केली. देवीच्या‍ ठिकाणापासून आजूबाजूच्यां परिसरात अष्टमातृका स्थाने आहेत. देवीच्याच सभोवती गावाला प्रदक्षि‍णा घालून देवनदी वाहते. सर्व देवांना जगदंबेच्या प्रकट होण्यने अत्यंत आनंद झाला व त्यांचा तो आनंदच जणु द्रवरुप होउन त्या‍ची नदी झाली असे मानून तिला देवनदी म्‍‍हणतात. पुढे याच नदीवर, त्रिवेणी संगम होतो तिथे सर्व धार्मिक कृत्यें होतात व काशी‍इतके महत्व असल्याचे मानतात. तिथे देह पडला तर पुन्‍‍हा जन्ममरण ना‍ही असे पंचक्रोशीतले लोक समजतात. कारण ही पश्चिम वाहिनी झालेली आहे. प्रयाग इतकेच महत्व या स्थळाला आहे.
मध्य‍भागी देवीभोययाची अंबिका हे जणू टपोरे गुलाबाचे फूल आणि तिच्या सभोवतीच्या अष्टोमातृका हया पर्ण, मुकुट व कळया असे मानतात, निघोजला मळाबाई, चोंभूतची मोक्काई वडानेरला भूतनाथ, लोणीला भैरवनाथ, शिरसुळेला खंडेराव, वडेझिरला तुकाई, बाभुळवाडेला शिवसदन, खिंडीमध्ये गजानन, पाडळीला दर्याबाई अशी जागृत ठिकाणे आहेत.
पुढे शके 1834 मधे म्हणजेच सन 1912 मध्ये (कै) श्री शंकर देवराव क्षीरसागर (आमचे वडील) यांनी अष्टभुजा देवीची सोनपितळी मूर्तीकवचाची स्थापना केली. तसेच मंदिर, गाभारा, सभामंडप, भव्यद्वार पुढे व मागे व पाण्याचा साठा जिथे मिळाला होता तिथे बारव बांधून तयार केली. कै. श्री शंकर देवराव क्षीरसागर हे देवीचे निस्सीम भक्त होते व स्वत जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत स्‍कॉलर व पंडीत, व्याचसंगी उपास‍‍‍क होते.
त्यांच्या पुढयात बसून पूजापाठ करायला सर्वसामान्य ब्राम्हंण धजावत नसत. त्यांनी ब-याच भक्तांना उत्तंम प्रकारे मार्गदर्शन केले आणि‍ संथाही दि‍ल्या‍. डॉ. कूर्तकोटी शंकराचार्य ति‍कडे आले असतांना क्षीरसागरांनी रसाळ संस्कृतमधे त्यांचा परि‍चय करून दि‍लाच आणि‍ स्वरचि‍त लोकांनी ति‍थल्या ति‍थेच त्यांना गौरविले. हे पाहून तेही फार आनंदि‍त झाले व त्यांनी स्व्तः आमच्या वडीलांचा सत्कात केला, हे मलाही आठवते. त्या‍चवेळी त्यांच्या सारखा वि‍द्वान पि‍ता लाभल्याचा मला अभिमान वाटला व त्यामुळे आजही मला गहिंवरून येते.
कै. श्री. शंकर देवराव क्षीरसागरांच्या रोजच्या आन्हिकात सप्तशती पाठ, ललिता सहस्त्र्नाम आणि अनेके स्तोत्रे, होमहवन पुजापाठ, दोन अडीच तासांचे जपजाप्य असे असायचे. त्यांनी अनेकांना नुसतेच मार्गदर्शनच केले नाही तर विनाप्रसिध्दी आर्थिक मदतही केली. ते लोक आजही भेटल्यावर दादांच्या बददल गौरवाने व कृतज्ञतेने बोलतात. आमचे वडील जाउन 5 तपेही गेली, तरीही देवीभोयरे गावातील सर्व मंडळी, सर्व परिसर त्यांच्या बददल आदरानेच बोलतो.
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved