श्री अंबिका देवीच्या जागृत व स्वयंभू स्थानाविषयी माहिती व स्थापनेचे स्वरूप |
|
देवीभोयरे या छोटयाशा गावातील श्री अंबिका देवीचे हे पवित्र स्वयंभू स्थान जागृत देवस्थान आहे. माहूरची श्री रेणुकामाता या ठिकाणी तादुंळाकार पाषाण मूर्तिच्या स्वरूपात स्वयंभू प्रगट झालेली असून ती दक्षिणभिमुखी आहे. दक्षिणेकडे मुख असलेली देवस्थाने जागृत असल्याचे मानण्यात येते. या स्थानाची उत्त्पतीची कथा विस्मयकारक आहे. |
|
क्षीरसागर हे गावातील प्रतिष्ठित ब्राम्हण घराणे. माहूरची श्री रेणुकामाता हे त्यांचे कुलदैवत. या घराण्याचे मूळ पुरूष रेणुकामातेच्या निस्सीम भक्तीपोटी नवरात्रामध्ये माहूरगडाची वारी नियमितपणे करीत असत. त्याकाळी हा दूरचा प्रवास अतिशय खडतर असे. पुढे वार्धक्यामुळे त्यांना हा जिकीरीचा प्रवास झेपेनासा झाल्यामुळे वारीचा त्यांचा नित्यनेम खंडित झाला. त्यांमुळे अतिशय व्यथित होऊन त्यांना रेणुकामातेच्या दर्शनाची तळमळ लागून राहिली. आणि काय आश्चर्य—श्री रेणुकामातेने सतत तीन दिवस त्यांना स्वप्न दृष्टांत देवून ‘’मीच तुला दर्शन द्यावयास आले आहे.’’असे सांगून विशिष्ट जागा दाखविली आणि त्या ठिकाणी खणल्यास ‘’मी प्रगट होईन’’असे संकेत दिले. तेच हे पवित्र स्थान की जेथे स्वप्न दृष्टांतानुसार खणल्यासनंतर श्री अंबिकेची तांदुळाकार पाषाण मूर्ति-(‘’तांदळाजमिनीमधून म्हणजे भुयारामधून स्व यंभू प्रगट झाली. या मूर्तिभोवती हळदीकुंकवाच्या- पेटयाही आढळून आल्या.
|
|
या ठिकाणी श्रीरेणुकामाता भुयारातून म्हणजे भूविवरातून प्रगट झाली म्हणून गावाला देवीभूविवर असे नाव प्राप्त झाले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन गावाचे नाव 'देवीभोयरे' असे रूढ झाले. |
|
देवी स्वयंभू प्रगट झाली तो दिवस पवित्र व महान उज्ज्वल योगाचा होता हे ध्यानात घेऊन त्यादिवशी लगेच एक वेदिका रचून त्यावर हया तांदुळाकार मूर्तिची मंत्र घोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच सभोवतालच्या परिसरात देवीचे नाव घेऊन खोदण्यात आले असता 40 फूटांवर जिवंत पाण्याचे झरे लागले. तेथे बारव बांधण्यात आली. त्यासाठी खोदकाम करतांना आणखी एक तांदुळाकार निर्गृण पाषण मूर्ति सापडली. तिची बारवेमध्येच प्रतिष्ठापना करण्यात आली. बारवेचे पाणी तीर्थाप्रमाणे गोड व पाचक आहे. जगदंबेची कृपा म्हाणून या बारवेला ज्ञानवापी असे म्हणतात. अष्टभुजा मूर्तिची स्थापना- क्षीरसागर घराण्याच्या पुढील पिढीतील आणखी एक निस्सीम देवीभक्त कै.शंकर देवराव क्षीरसागर उर्फ रावसाहेब ( निवृत्त मामलेदार ) यांनी ‘’तांदळया’’ भोवती म्हाणजे मूळ स्वयंभू तांदुळाकार मूर्तिभोवती प्रस्तुतिची अष्टभुजा देवीची सोनपितळी सुंदर कवचमूर्ति श्रावण शु.8(अष्टमी) शके 1834 म्हणजे ता. 18. ऑगस्ट 1912 या मंगल दिनी स्थापन केली. |
|
त्यांनी ही मूर्ति पाटण ( जि.सातारा ) येथील तत्कालीन कसबी मूर्तिकार नारायण यांच्याकडून सोनपितळी पत्र्यामध्ये घडवून घेतली. सप्ताशतीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ‘’घण्टाशूलहलानि शंखमुसले चक्रं धनुःसायकं’’ही आयुधे मूर्तिच्या आठ हातांमध्ये आहेत. उजव्या हातामध्ये वरून क्रमाने चक्र, त्रिशूल, मुसळ व बाण आणि डाव्या हातांमध्ये याच क्रमाने शंख,घंटा,हल (नागंर) आणि धनुष्य ही आयुधे बसवून मूर्तिला सगुण साकार असे सुबक रूप दिले आहे. कवच मूर्तिची घडण कल्पकतेने केलेली असल्याबमुळे अंबाबाईला नऊवारी लुगडे नेसवता येते आणि चोळी पण घालता येते. त्यामुळे अंबिकादेवी जणू प्रत्यक्ष येथे येऊन बसलेली आहे इतकी तिची मूर्ति सजीव वाटते. श्री अंबिकादेवी कमळावर बसलेली असून मांडी घालून उजवा पाय खाली सोडलेला आहे. मूर्तिच्या सर्व हातांचे पंजे काढता-घालता येण्यासारखे असल्यामुळे हातांमध्ये चूडाही भरता येतो. |
|
मूळ स्वयंभू तांदुळाकार मूर्ति आणि त्यावर स्थापन केलेली अष्टकभुजादेवीची मूर्ति या दोन्हीं मूर्ति दक्षिणाभिमुखी आहेत हे या स्थानाचे खास वैशिष्टय आहे. म्हणून हे स्थान जागृत असल्याचा अनुभव आजवर अनेक भक्तांना आलेला आहे. |
|
कै.रावसाहेब क्षीरसागर (मामलेदार) हे संस्कृत भाषेचे विद्वान पंडीत आणि गाढे अभ्यासक होते. सन 1894 मध्ये मॅट्रीकच्या परीक्षेत संस्कृत विषयामध्ये तत्कालीन मुंबई इलाख्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी मानाची "जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ति प्राप्ता केली होती. अध्यात्म विषयात गोडी असल्यामुळे त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषांमध्ये अनेक गद्य आणि पद्य रचना केल्या आहेत. त्यांनी लिहलेला एक बहुमोल ग्रंथ म्हृणजे "श्रीनरसिंहचरित्र" हा 18 अध्याय अधिक रहस्य निरूपणाचे 10 अध्याय असा सुमारे 2800 ओव्या’ असलेला ग्रंथ होय. पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यातील "नीरानरसिंगपूर" या श्रीनृसिंहाच्या जागृत क्षेत्राचे माहात्म्य वर्णन करणा-या या ग्रंथामध्ये त्यांनी भक्त प्रल्हादाची कथा आणि श्रीनृसिंहाचे प्रगटीकरण अतिशय रसाळ भाषेमध्ये ओवीबध्द केले आहे. हा ग्रंथ प्रथमतःसन 1930 मध्ये प्रसिध्द झाला होता. त्यांचे सुपुत्र श्री.सुधाकर.( भाऊसाहेब ) व श्री.विनायक (अण्णासाहेब) यांनी नृसिंह भक्तांच्या मागणीवरून भगिनी कै.सौ.कमल वंसत अलाट हिच्याप्रेरणेने त्याची दुसरी आवृत्ति सन 2004 मध्ये प्रकाशित केली आहे.
|
|
श्रीजगदंबेच्या मूर्ति प्रतिष्ठापनेच्या शुभकार्यानंतर कै. रावसाहेब क्षीरसागर यांनी सामाजिक सुधारणेचे बहुमोल व महत्वपूर्ण कार्य केले ते म्हणजे तत्कालीन बहुजन समाजाला त्यांनी एकत्र आणून श्री जगदंबेच्या भक्तीची गोडी लावली. त्याकाळी साक्षरतेचे प्रमाण खूप कमी असल्याने बहुजन समाज बहुतांशी अशिक्षित होता. त्या समाजाला देवीच्या भक्तीमार्गावर एकत्र आणण्यासाठी त्यांनी देवीभक्तीपर रसाळ पदे रचून त्यांना सुश्राव्य चाली लावल्या की जेणेकरून बहुजनांना ती पदे सुलभतेने गुणगुणता यावीत ही सर्व पदे त्यांनी सन 1930 मध्ये ''भक्तिसुधानिधी'' या नावाने पुस्तेकरूपात प्रसिध्द केली होती. |
|
नवरात्र उत्सव परंपरा- वर उल्लेख केल्याप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी कै.रावसाहेब क्षीरसागर यांनी येथे नवरात्रामध्ये सामूहिक आरती़, नंतर छबिन्यासह गावातील अन्य ग्राम देवतांच्या आरत्या करून गावप्रदक्षिणा घालून मंदीरात परत आल्यानंतर श्री जगदंबेच्या नामाचा गजर, त्यानंतर मूळ माहूरच्या पदांसहित संगीत दोन प्रदक्षिणा आणि त्यानंतर माहूरची काही पदे व भक्तीसुधानिधीमधील काही पदे समाविष्ट असलेल्या पंचपदीचे समूहगान अशी वैशिष्टपूर्ण उत्सव पंरपरा चालू केली. त्याद्वारे त्यांनी गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लहान थोरांना अंबाबाईच्या भक्तीची गोडी लावली. |
|
त्याचबरोबर नवरात्रातील नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देवून भजन, प्रवचन, एकनाथी भारूड या सारख्या लोककलांना चालना देण्याबरोबर त्यांनी समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य त्या काळात केले. एवढेच नव्हे तर नातलग आणि गावातील होतकरू कलावंतांच्या सहभागाने त्यांनी त्या काळातील '' मानापमान'' , सौभद्र'' , पुण्याप्रभाव'' आदि संगीत नाटकांचे प्रयोग यशस्वीपणे सादर केले. त्यासाठी त्यांनी नेपथ्याचे पडदेही स्वखर्चाने रंगवून घेतले होते. अलीकडील ग्रामीण नाटयस्पर्धांचा पायाच जणू त्याद्वारे घातला होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. |
|
दस-याच्या आदल्या दिवशी म्हणजे अश्विन शु.9(नवमी) तिथीला नवचंडी होमहवन करण्यात येते. सर्व ग्रामस्थांच्या सुखसमृध्दीसाठी आणि आरोग्यासाठी आणि गावाच्या भरभराटीसाठी हा यज्ञ करण्याची परंपरा आहे. गावाच्या वतीने त्याचे यजमान पद क्षीरसागर घराण्याकडे आहे. |