मंदिराचे व देवीचे स्वरूप |
|
पूर्वी श्री. जगदंबेचे देऊळ हेमाडपंती होते. मूर्ति दक्षिणाभिमुख आहे. सहसा मूर्ति दक्षिणाभिमुख नसते. पूर्वी मंदिर थोडे लहान होते. आता विस्तृत केलेले आहे. हे देवस्थान जागृत आहे व देवी सुलभपणे नवसाला पावते असा अनेकांना अनुभव आलेला आहे. देवीच्या निर्गुण निराकार तांदुळामूर्तिपुढे बसविलेले सगुण साकार कवच पितळी सोनपितळी पत्र्याचे आहे. सप्तशती स्तोत्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणेच देवीचे स्वरुप महासरस्वतीचे आहे. श्री. नारायण म्हणून पाटण येथील शिल्पकाराने ही मूर्ति बनवली असुन ती अत्यंत सुरेख, सुंदर स्वरूप आहे. कमळावर मांडी घालून बसलेली, हातात आयुधे, मनगटापासून हात सुटे करून चुडा वगैरे भरता येतो. देवी सर्व अलंकारांनी नटलेली आहे व तिच्या पुढून उठावेसेच वाटत नाही. तिचे रुप डोळयात साठवून, भारलेल्या अवस्थेत तिथेच बसावेसे वाटते इतके ते रूप विलोभनीय आहे.
|
घंटा शुल हलांनि शंख मुसले चक्र धनु सायकं, |
हस्ताशब्जैदधातिं घनांत विलसतशीतांशु तुल्याप्रभा । |
गोरीदेहं समुद्रभवां त्रिजगतां आधारभुतां महा पूर्वामंत्र |
सरस्वतीअनुभजे शुंभादी दैत्यार्दिनिम ।। |
|
म्हाणजेच याचा अर्थ असा की जिने आपल्या करकमलामध्ये घंटा, शूल, हलनांगर, शंख, मुसळ, चक्र व धनुष्यबाण धारण केलेले आहेत. शरदामधील चंद्राप्रमाणे जिची मनोहर कांती आहे. जी तिन्ही लोकांना आधारभूत अशी असून, जिने शुंभ व इतर राक्षसांचा नाश केलेला आहे व जी गौरी पार्वतीच्या शरीरापासून प्रकट झाली अशा देवी शक्तिचा मी आदर करतो व तिचे निरंतर ध्यान भजन करतो. |
|
पायात पैंजण, तोडे, चाळ, जोडवी व मासोळया आहेत. हातात बिलवर, गोठ, पाटल्या, तोडे, वाकी असे दागिने आहेत. मोहोर, अंगठया आहेत. गळयात पूतळयांच्या माळा, एकदाणी साज, मोहनमाळ, सोन्याचे मंगळसूत्र इत्यादि दागिने आहेत. कानात कुडी व नाकात नथ आहे. |
|
देवी पुढील गाभा-याचा दरवाजा भाऊ नामक एका भक्तानने स्वखर्चाने बनवून वाहिलेला आहे. तो सुध्दा उत्तम शिल्पकार होता. दरवाजाचे काम सूबक नक्षीदार आहे. देवीपूढे सिंह वाहन जे धर्मस्वरूप मानले जाते ती सोनपितळेची मूर्ती 16.5 किलो वजनाची करून घेतली. आई दादांची इच्छा होती म्हणून सिंह वाहन केले. शिल्पकार नगरचा असून तोही चांगला सुबक काम करणारा होता. सिंहाची मूर्ती 1982 साली समंत्रक गुळाची तुळा करून, त्याचवेळी देवीचीही पेढयांची तूळा करुन अर्पण केली. त्यारनंतर 1983 साली शतचंडी केली. त्रिंबकेश्वरहून 10 विद्वान ब्राम्हण आणवून घेतले होते. यथासांग मंत्रघोषात भंडारा करून अन्नदान केले व सांगता केली. श्री जगदंबेने हे करवून घेतले ही तिची आमच्यावर कृपाच झाली. माझ्या मनातला हेतू तिने पूर्ण करून घेतला. हया तिच्या अलौकिक प्रेमाचा मी कधीही उतराई होऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा ही सेवा घडून येण्यासाठी इथेच जन्म यावा व याचा कुळात तिची सेवा माझ्या कडून व्हावी ही तिच्या चरणी प्रार्थना आहे. |
|
|
|
|
|
|