|
देवीची शक्तिपीठे कशी निर्माण झाली, याची पुराणकथा आपण वरच्या भागात वाचली आहेच. आता माहुरगडच्या रेणुकामातेची कथा व देविभोय-याच्या अंबाबाई विषयी जाणुन घेउ. क्षीरसागर घराण्याची कुलदेवता ही लक्ष्मी व्यंकटेश, मल्हारी म्हाळसाकांत व रेणुकामाता (जगदंबा) अशी त्रयीची आहे. रेणुकामाता ही सर्व विश्वाची माता आहे असे समजले जाते ती माहुरगडी प्रकट झाल्याची कथा खालीलप्रमाणे आहे. |
जमदग्नी ऋषीची रेणुका ही पत्नी होती. ही सर्व मंडळी आश्रम करुन जेथे रहात होती, तेथे राजा सहस्त्रार्जुन हा परिवारासह व स्त्रियांसह जलविहार करीत होता. नेहमी प्रमाणे ती पाणी आणायला गेली तेव्हां ती राजाचा जलविहार पहात उभी राहिली व पाणी आणायला उशीर झाला. जमदग्नींनी तिला उशीरा येण्याचे कारण विचारल्यावर, तिने खरे ते सांगितले. त्यामुळे जमदग्नी संतप्त झाले व तू मनाने व्यभिचार केलास, तूला शिक्षा झालीच पाहिजे, असे सांगून त्यांनी आपल्यां मुलांना आईचे डोके उडविण्याची आज्ञा केली. तीन मुलांनी आज्ञा नाकारली, त्यांना जमदग्नीनी शाप दिला. परशुराम हेही त्यांचे पुत्र ते त्यावेळी घरी नव्हाते, ते आल्यावर त्यांनाही जमदग्नींनी आईचे डोके उडवायला सांगितले. परशुरामांनी पितृआज्ञा प्रमाण मानून आईचे डोके उडविले. जमदग्नी ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले व त्यांना वर मागायला सांगितला. परशुरामांनी आईला पुन्हा जिवंत करा असा वर मागितला. परशुरामाचे मातृप्रेम, चतुराई व आज्ञापालन यावर प्रसन्न होउन त्यांनी रेणुकेला आणि आपल्या तीन मुलांना पुन्हा जिवंत केले. कालांतराने ती जेव्हां मरण पावली, तेव्हा तिचे और्ध्व्देहिक साक्षात श्रीदत्तंगुरुंनी केले. त्यावेळी परशुरामांना या प्रसंगाची आठवण झाली व ते मोठमोठयांनी आक्रोश करु लागले. परशुरामांचे खरे मातृप्रेम पाहून श्री दत्त गुरुनी त्यास सांगितले की मी तुला जगन्मारतेचे दर्शन घडवितो. मी सांगेपर्यंत डोळे बंद ठेव, उघडु नकोस. श्रीदत्तगुरुंनी जगदंबेला आवाहन करताच ती प्रकट होउ लागली. परंतु परशुरामांना धीर धरवला नाही व ती भूमीतून छातीइतकीच वर येताच त्यांनी डोळे उघडले. त्यामुळे श्रीदत्तगुरुंनी रेणुकामाता ही मुखाकारानेच इथे राहील व माहूर हे पूर्णपीठ म्हणून नावाजेल असे सांगितले. |